शेतात मका पेरणी वरून झालेल्या वादातून झाला होता खून….
नेवासा (वार्ताहर) – शेतीच्या वादातून झालेल्या गंभीर मारहाणीतून मृत्यू झालेल्या प्रकरणात आरोपी चंद्रकांत बनसोडे यांना नेवासा सत्र न्यायालयाने अटकेपूर्व जामीन मंजूर केला आहे. अॅड. सुयोग राठी यांच्या मार्फत दाखल झालेल्या जामीन अर्जावर सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयाने अटी व शर्तींसह हा निर्णय दिला.
घटनेची पार्श्वभूमी अशी की, दिनांक ९ जून २०२५ रोजी सकाळी सुमारास फिर्यादी गोरक्षनाथ बनसोडे हे आपल्या कुटुंबासह घरी असताना, त्यांचे चुलते चंद्रकांत बनसोडे यांच्याशी शेतातील मक्याच्या पेरणीवरून वाद झाला. यावेळी चंद्रकांत यांचा मुलगा रोहित बनसोडे याने लोखंडी पाहार घेऊन येत फिर्यादींच्या वडिलांच्या डोक्यावर गंभीर वार केला. त्यात आदिनाथ बनसोडे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना मृत्यू झाला. याच वेळी चंद्रकांत बनसोडे यांनी विटेने डोळ्यावर वार करून फिर्यादीस दुखापत केली, तर सविता बनसोडे यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली होती.
ही घटना शेजारील भाऊसाहेब बनसोडे, फिर्यादींची पत्नी काजल व आई मिराबाई यांच्या उपस्थितीत घडली. त्यांच्या मदतीने गंभीर जखमींना वाचवण्यात आले. दरम्यान, सर्व आरोपी तेथून पळून गेले.
या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात १० जून रोजी IPC अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंतर आदिनाथ बनसोडे यांचा मृत्यू झाल्यामुळे गुन्ह्यात कलम १०३(१) अंतर्भूत करण्यात आले.
या गंभीर गुन्ह्यात आरोपी चंद्रकांत बनसोडे यांनी अॅड. सुयोग राठी यांच्या मार्गदर्शनाखाली अटकेपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. युक्तिवादानंतर मा. न्यायाधीश वाघमारे साहेबांनी आरोपीस अटी व शर्तींसह जामीन मंजूर केला. या प्रकरणात अॅड. नरेंद्र काकडे पाटील, अॅड. अश्वप्रताप सिंग जोनवाल, अॅड. दैभव बनकर यांनी सहकार्य केले.