शेतकऱ्यांना मात्र मर्यादित फायदा
नेवासा
भारत आणि ब्रिटन यांच्यात मुक्त व्यापार करार झाल्याची अधिकृत घोषणा नुकतीच करण्यात आली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान किर स्टारमर यांच्या उपस्थितीत वाणिज्य मंत्र्यांच्या साक्षीने या ऐतिहासिक करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
या कराराच्या माध्यमातून दोन्ही देशांनी अनेक उत्पादनांवरील आयात शुल्क हटवले असून, परिणामी व्यापाऱ्यांवर कराचा भार पडणार नाही. करारात मुख्यत्वे हळद, मिरी, वेलदोडा, लोणची, डाळी, आंब्याचे प्रक्रिया केलेले पदार्थ, तसेच भारतीय कपडे, पादत्राणे आणि प्रक्रिया खाद्यपदार्थ यांचा समावेश करण्यात आला आहे.
या करारामुळे भारतातील उत्पादकांना ब्रिटनमध्ये नवा बाजार मिळणार असला तरी, शेतकऱ्यांना थेट फायदा होण्याची शक्यता कमी असल्याचे कृषी शास्त्रज्ञ डॉ. अशोकराव ढगे यांनी स्पष्ट केले आहे. “शेतीमालाच्या थेट विक्रीपेक्षा त्यावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योजकांना या कराराचा अधिक फायदा होईल. त्यामुळे हा करार उद्योगपती आणि निर्यातदारांसाठी फायदेशीर आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
करारामुळे शेतीमाल प्रक्रिया उद्योगांना चालना, रोजगार निर्मितीत वाढ आणि भारतीय उत्पादनांचे डिझाईन आंतरराष्ट्रीय बाजारात पोहोचण्याची संधी निर्माण होणार आहे. त्यामुळे भारतीय उद्योग जगताकडून या कराराचे स्वागत करण्यात येत आहे.
जागतिक व्यापार हे क्षेत्र दिवसेंदिवस अधिक स्पर्धात्मक व संवेदनशील होत असताना, हा करार भारतासाठी सकारात्मक व विधायक ठरेल, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.