नेवासा पोलिसांची धाडसी कारवाई; दोन गावठी कट्टे, मोबाईल, मोटरसायकलसह ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त
नेवासा (ता. २९ जुलै) :
नेवासा पोलिसांनी मंगळवारी पहाटे रात्रगस्त दरम्यान थरारक पाठलाग करून दोघा सराईत गुन्हेगारांना दोन गावठी कट्ट्यांसह अटक केली. भेंडा फॅक्टरीजवळ संशयास्पद हालचाली पाहून रात्रगस्त करत असलेल्या पोलिसांनी कारवाई केली असून या वेळी ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस कॉन्स्टेबल वाल्मीक वाघ व चालक संतोष खंडागळे हे रात्रगस्त करीत असताना पहाटे ३ च्या सुमारास भेंडा फॅक्टरी जवळ दोन तरुण मोटरसायकलवरून वेगात जाताना दिसले. पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता दोघेही पळाले. पाठलाग करून नांदूर-शिकारी परिसरात त्यांना पकडण्यात आले.
पकडलेल्यांची नावे सचिन रमेश पन्हाळे (२५) व आदित्य संतोष जाधव (२१), दोघेही रा. शेवगाव अशी असून, हे दोघे पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. तपासादरम्यान पोलिसांना संशय वाटला की आरोपींनी हातून काहीतरी फेकले आहे. अधिक चौकशी केल्यानंतर आरोपींनी दोन गावठी कट्टे फेकल्याचे कबूल केले. पोलिसांनी शोध घेतल्यानंतर दोन्ही कट्टे मिळून आले.
प्राथमिक चौकशीत आरोपींनी हे शस्त्र मध्यप्रदेशातून खरेदी करून आणल्याचे सांगितले. आरोपींकडून दोन कट्टे (किंमत अंदाजे २०,००० रुपये), टीव्हीएस स्टार मोटरसायकल, दोन मोबाईल असा एकूण ७५,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल वाल्मीक वाघ यांच्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पो.ह. शहाजी आंधळे करत आहेत.
सचिन पन्हाळे याच्यावर यापूर्वी दंगल, अग्नीशस्त्र बाळगणे, जंगली प्राणी तस्करी अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे शेवगाव, एमआयडीसी व नेवासा पोलीस ठाण्यांत दाखल आहेत. लोकसभा निवडणुकांदरम्यान शस्त्र मिरवल्याप्रकरणी नेवासा पोलिसांनी त्याला रंगेहात पकडले होते.
दोन्ही आरोपींना आज पोलीस रिमांडसाठी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. कट्टा कोणी दिला, कशासाठी वापरणार होते, या मागे कोणाचा हात आहे याचा तपास पोलिसांकडून बारकाईने सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. धनंजय जाधव, पो.उपनिरीक्षक मनोज अहिरे, पो.ह. शहाजी आंधळे, पो.कॉ. वाल्मीक वाघ, संतोष खंडागळे, नारायण डमाळे, वासुदेव डमाळे, गणेश जाधव यांनी केली
1 *********पोलिसांचे आवाहन*********
गावठी कट्टे, शस्त्रासंबंधी कोणतीही माहिती मिळाल्यास ती त्वरीत पोलिसांपर्यंत पोहोचवावी. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे आवाहन नेवासा पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी केले आहे.
(