व्यापाऱ्यांचे आमदार लंघेंना निवेदन, अतिक्रमणमुक्त बाजारपेठेचा आश्वासनाचा पाठपुरावा करणार !
नेवासा (प्रतिनिधी) –
शहरातील सरकारी व काही खाजगी संस्थांच्या मालकीच्या जागांवर व्यापारी संकुल उभारून अतिक्रमणाचा प्रश्न कायमचा सोडवावा, अशी मागणी व्यापारी कमिटीने केली असून या मागणीचे निवेदन त्यांनी आमदार विठ्ठलराव लंघे यांना दिले.
या निवेदनप्रसंगी बोलताना महेश मापारी यांनी सांगितले की, “शहरातील बाजारपेठेच्या आसपास व्यापारी संकुल उभारल्यास गाळ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल. त्यामुळे आजवर बाजारपेठेला मिळू न शकलेला शिस्तबद्ध व नियोजनबद्ध विकास साधता येईल. यामुळे तरुणांना रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होतील.”
या निवेदनावर सकारात्मक प्रतिसाद देताना आमदार विठ्ठलराव लंघे यांनी लवकरच संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून व्यापारी संघटनेच्या मेळाव्याच्या माध्यमातून निर्णय जाहीर करण्याचे आश्वासन दिले. या संदर्भात नगरपरिषद व महसूल विभागाशी समन्वय साधून आवश्यक पावले उचलण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी व्यापारी कमिटीचे महेश मापारी, मनोज पारखे, रुपेश उपाध्ये, कुणाल मांडण, लक्ष्मीकांत डहाळे, संदीप आलवणे, सचिन सावंत, संदेश शिंगी, पिंटू परदेशी व अन्य व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.