शनि देवाला अभिषेक करून केले मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन—
(नेवासा प्रतिनिधी) – नेवासा तालुक्यातील शिंगणापूर येथील जगप्रसिद्ध शनेश्वर देवस्थानातील घोटाळ्यांचा पर्दाफाश करून त्याविरोधात सातत्याने लढा देणारे प्रदेश काँग्रेसचे नेते संभाजी माळवदे यांनी आज शनिदेवाचे दर्शन घेऊन अभिषेक केला. यावेळी बोलताना त्यांनी शासनाचा निर्णय स्वागतार्ह असल्याचे सांगितले. मात्र आता घोटाळेबहाद्दरांवर तातडीने कठोर कारवाई व्हावी, अशी ठाम भूमिका त्यांनी व्यक्त केली.
गेल्या काही वर्षांपासून शनेश्वर देवस्थानात कर्मचारी भरती घोटाळा, ऑनलाईन पूजा अॅप, बनावट क्यूआर कोड, देणगी पावत्या, तसेच पार्किंग, अन्नछत्र, गोशाळा, तेलाचे टेंडर या माध्यमातून आजी-माजी पदाधिकारी, कर्मचारी आणि पुजार्यांनी केलेल्या करोडो रुपयांच्या गैरव्यवहारांचा मोठा भांडाफोड झाला होता. यावर तालुकाभरातून मोठा गदारोळ उठला. तक्रारी, आंदोलने, निवेदने या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.
या सर्व भ्रष्टाचार, अनियमितता आणि गैरकारभाराची गंभीर दखल घेत राज्य सरकारने नुकताच आदेश जारी करून शनेश्वर देवस्थान ट्रस्ट बरखास्त केला आहे. जिल्हाधिकारी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करून देवस्थान सरकारजमा करण्यात आले असून, श्री शनेश्वर देवस्थान विश्वस्त व्यवस्था अधिनियम – २०१८ लागू करून नव्या व्यवस्थापन समितीची स्थापना होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या संपूर्ण लढ्यात संभाजी माळवदे यांची भूमिका ठळक राहिली. शिंगणापूर येथे दोन वेळा आमरण आंदोलन, पोलिस अधीक्षक, धर्मादाय आयुक्त, मंत्रालय येथे वारंवार निवेदने, ठाम भूमिका आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा यामुळे प्रशासनाला कारवाई करण्यास भाग पाडण्यात आले. आज त्या लढ्याला खऱ्या अर्थाने यश आले असून शनिभक्तांचा विजय झाल्याचे माळवदे यांनी स्पष्ट केले.

या वेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अशोकराव काळे, शनिभक्त दत्तात्रय कुऱ्हाट, गणेश साळवे, वंचित आघाडीचे विजय गायकवाड, संजय वाघमारे, युवा नेते हरीश चक्रनारायण, गणपतराव मोरे, शनिभक्त दादा घायाळ आदींसह ग्रामस्थ व शनिभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट :
👉 “शासनाच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. आज शनिभक्तांच्या मागणीला व लढ्याला खऱ्या अर्थाने यश मिळाले आहे. आता देवस्थानमध्ये ज्या कर्मचाऱ्यांनी व पदाधिकाऱ्यांनी घोटाळा केला, त्यांच्यावर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.”
– संभाजी माळवदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
👉 “संभाजीराजे माळवदे यांनी कुठलीही तमा न बाळगता खरा घोटाळा उघडकीस आणून तीव्र लढा दिला. आंदोलन, निवेदने करून प्रशासनाला कारवाईस भाग पाडले. खरे श्रेय त्यांनाच जाते.”
– दत्तात्रय कुऱ्हाट, शनिभक्त, शिंगणापूर
👉 “या यशाचे खरे श्रेय माळवदे यांना व त्यांच्या लढ्यास आहे. आम्ही व तालुक्यातील शनिभक्त, शिंगणापूर ग्रामस्थ याचे साक्षीदार आहोत.”
– दादा घायाळ, शनिभक्त, शिंगणापूर

