शिरसगाव स्नेहमेळाव्यात महायुतीच्या ऐक्याचा संकल्प
नेवासा (प्रतिनिधी)
शिरसगावच्या पावन गणपती मंदिराच्या अंगणात दिवाळी पाडव्यानिमित्त रंगलेल्या फराळ व स्नेहमेळाव्याचे वातावरण एकात्मतेच्या, उत्साहाच्या आणि भावनिक ऐक्याच्या रंगांनी नटले होते. या स्नेहमेळाव्यात बोलताना आमदार विठ्ठलराव लंघे यांनी महायुतीच्या राजकारणाला बळ देणारा आशावादी संदेश देत, “युतीधर्म पाळून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकदिलाने उतरणे हाच आपल्या कार्यकर्त्यांचा खरा दीपोत्सव ठरेल” असे आवाहन केले
आ. लंघे म्हणाले, “जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायतींच्या निवडणुका आता हाती येत आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील लवकरच याबाबत बैठक घेणार आहेत. विधानसभेसाठी आपण ज्या एकतेने काम केले, त्याच उर्मीने या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी योगदान द्यावे. कारण ही तर कार्यकर्त्यांचीच निवडणूक आहे — त्यामुळे आपली एकजूट आणि परिश्रम हेच महायुतीच्या विजयाचे दीप बनतील.”
ते पुढे म्हणाले, “अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे संसार पाण्यात वाहून गेले. त्यांच्या बांधावर जावून मी स्वतः नुकसान पाहिले, जिल्हाधिकाऱ्यांना परिस्थिती दाखवली. प्रत्येक शेतकऱ्याला योग्य नुकसानभरपाई मिळेपर्यंत मी शांत बसणार नाही. त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा समाधानाचा उजेड फुलवणे ही माझी जबाबदारी आहे.”
या भावनिक मेळाव्यात उपस्थितांनी दिवंगत माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांच्या स्मृतीला सामूहिक श्रद्धांजली वाहून त्यांच्या कार्याचा वारसा जपण्याचा संकल्प केला.
या स्नेहमेळाव्याला पंचगंगा उद्योग समूहप्रमुख प्रभाकर काका शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्या डॉ. तेजश्री लंघे, दिलीपराव वाघचौरे बाळासाहेब पवार, ज्ञानेश्वर पेचे, प्रताप चिंधे, सुनिल लंघे, बिरबल दरवडे, रमेश गणगे, संजय लंघे, मनोज पारखे, हरिभाऊ तुवर, नवनाथ साळुंके, शिवाजी मते, योगेश मस्के, किशोर गारुळे पांडुरंग लंघे, माजी पंचायत समिती सदस्य प्रदीप ढोकणे, संजय पवार, सुरेश डिके, सचिन देसरडा, ललित मोटे, तुकाराम गायकवाड, अशोकराव ढगे, बबनराव पिसोटे, दादासाहेब पोटे, अशोक चौधरी तसेच तालुक्यातील विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती उत्सवात सोनेरी झळाळी आणणारी ठरली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक लंघे यांनी केले, तर आभार प्रदर्शन दत्तात्रय पोटे यांनी केले.

