नेवासा : “नेवासाच्या विकासासाठी संघर्ष करण्यास आम्ही सदैव तयार आहोत,” असे प्रतिपादन माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी करत, क्रांतिकारी शेतकरी पक्ष व आम आदमी पार्टीने नगराध्यक्षासह उभे केलेल्या १८ तरुण व अनुभवी उमेदवारांच्या मिश्र पथकाला विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला.
नेवासा नगरपंचायत निवडणूक २०२५ मध्ये गडाख यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिकारी शेतकरी पक्ष व आम आदमी पार्टी एकत्र लढत आहेत. नगराध्यक्षपदासाठी नंदकुमार लक्ष्मणराव पाटील हे अधिकृत उमेदवार रिंगणात उतरले असून, आम आदमी पार्टीचे नेते संजय सुखदान यांच्या पत्नी नगरसेविका पदासाठी उमेदवारी करत आहेत.

या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ-शुभारंभ व रॅलीचा प्रारंभ बुधवार, २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता मोहिनिराज मंदिरात नारळ फोडून करण्यात आला.
यानंतर चार ते पाच हजार कार्यकर्त्यांचा सहभाग असलेली रॅली जुनी पेठ गणपती मंदिर, भराव, लोखंडे गल्ली, प्रमुख बाजारपेठ, खोलेश्वर मार्ग झाली आणि मळगंगा मंदिरात समारोप करण्यात आला.
या ठिकाणी बोलताना गडाख म्हणाले, “माझ्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जाते, पण मी विकासाच्या मुद्द्यावर ठाम आहे. ही निवडणूक केवळ विकासावरच लढवणार असून, आमचे सर्व उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होतील,” असे ते म्हणाले. रॅलीस आम आदमी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

