नेवासा
मागील पंचवार्षिकात प्रभाग क्रमांक दोनमध्ये झालेल्या विकासकामांचे मॉडेल संपूर्ण नेवासा शहरात राबवण्याचे स्वप्न असल्याचे एडवोकेट संजय सुखदान यांनी प्रचारयात्रेदरम्यान सांगितले. शाश्वत, नियोजनबद्ध व लोकाभिमुख उपक्रमांच्या आधारे शहराचा कायापालट करणे हा आपला हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
क्रांतिकारी शेतकरी पक्ष आणि आम आदमी पार्टीच्या संयुक्त उमेदवार सौ. शालिनीताई संजय सुखदान या पुन्हा एकदा प्रभाग दोनमधून रिंगणात असून, यावेळीही त्यांनी प्रचारात सर्वाधिक आघाडी घेतली आहे. माजी मंत्री शंकरराव गडाख आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नंदकुमार पाटील यांच्यासह त्या शहराच्या विकासआराखड्याची मांडणी करत आहेत.
“घरपट्टी हाफ, पाणीपट्टी माप” हा त्यांचा नारा संपूर्ण नेवासा शहरात चर्चेत असून, नागरिकांना मोफत वीज उपलब्ध करून देण्याचा आराखडाही त्यांच्याकडे तयार आहे. दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या लोकहिताच्या योजनांच्या धर्तीवर नेवासा शहराचा विकास करण्यात येणार असल्याचे सुखदान दाम्पत्य सांगते.
शहरातील कचरा, पाणी वाहतूक व स्वच्छतेच्या मूलभूत समस्या सोडवताना उपनगरांवरील अन्याय व दुर्लक्ष दूर करण्याचा त्यांनी शब्द दिला. उपनगरांसाठी स्वतंत्र रस्ते, सांडपाणी व पाणीपुरवठा सुविधा उभारण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला.
नेवासा शहरातील शासकीय भूखंडांवरील वस्त्यांना मालकीहक्क मिळवून देणे हे प्रमुखत्वाचे काम असल्याचे एड. संजय सुखदान यांनी स्पष्ट केले. तरुणांसाठी रोजगारनिर्मितीसाठी मिनी एमआयडीसी उभारणीचा पाठपुरावा करणे हे आपल्या अजेंड्यातील महत्त्वाचे काम असल्याचेही त्यांनी मतदारांसमोर मांडले.

