स्वच्छतेच्या प्रश्नावरून उपनगराध्यक्ष व नगराध्यक्षांच्या कारभार रस्त्यावरून…
स्वच्छतेच्या मुद्यावरून उपनगराध्यक्षांचा नगरपंचायत आवारात कारभार

नेवासा
नेवासा नगरपंचायतीत सोमवारी (दि. २७ जानेवारी) सत्ताधारी व विरोधकांमधील संघर्ष चिघळला असून नगराध्यक्ष डॉ. करणसिंह भाऊसाहेब घुले यांनी उपनगराध्यक्ष व काही विरोधी नगरसेवकांसह त्यांच्या समर्थकांवर बेकायदेशीर जमाव जमवून दालन बळकावणे, शासकीय कामकाजात अडथळा आणणे व दांडगाई केल्याप्रकरणी मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दिल्यानंतर रात्री उशिरा १७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगराध्यक्षांनी दिलेल्या निवेदनानुसार, सोमवारी सकाळी सुमारे अकरा वाजता ते आपल्या दालनात नागरिकांच्या गाठीभेटी घेत असताना संजय सुखदान, सौ. शालिनी सुखदान, जालिंदर गवळी, राजू काळे, आसिफ पठाण, जयश्री शिंदे, दिनेश व्यवहारे, सोनल चव्हाण, कुऱ्हे, अनिल शिंदे, स्वप्नील मापारी, धनु काळे, अनिकेत मापारी, संभाजी धोत्रे, जयदीप जामदार यांच्यासह आठ ते दहा जणांनी बळजबरीने दालनाचा ताबा घेतला. यावेळी नगराध्यक्ष व त्यांच्या सहकाऱ्यांना अर्वाच्य व शिवराळ भाषेत दमदाटी करून बाहेर काढण्यात आले, खुर्ची व कागदपत्रे फेकून देण्यात आली तसेच नगराध्यक्ष व त्यांच्या नावाच्या पाट्या काढून टाकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे जीवितास धोका निर्माण झाल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याच वेळी नगरपंचायतीतील कर्तव्यावर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या जागेवरून हाकलून देत झेंडा प्रांगणात उभे राहण्यास भाग पाडल्याचा गंभीर आरोपही नगराध्यक्षांनी केला आहे. या बेकायदेशीर कृत्यांवर तात्काळ फौजदारी व प्रशासकीय कारवाई न झाल्यास नगरपंचायत इमारतीत कामकाज न करता रस्त्यावर बसून कामकाज करण्याचा इशाराही नगराध्यक्षांनी दिला आहे.
दरम्यान, याच घटनेच्या पार्श्वभूमीवर उपनगराध्यक्ष व विरोधी नगरसेवकांनी वेगळी भूमिका मांडली आहे. उपनगराध्यक्ष यांच्या दालनात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीची सूचना दि. २२ जानेवारी रोजी प्रशासनाला देण्यात आली होती. मात्र दि. २७ जानेवारी रोजी उपनगराध्यक्ष व नगरसेवक बैठकीसाठी नगरपंचायत कार्यालयात आले असता उपनगराध्यक्षांच्या दालनाची कोणतीही स्वच्छता करण्यात आलेली नव्हती तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी अनुपस्थित होते. याउलट नगराध्यक्षांचे दालन मात्र पूर्णपणे स्वच्छ असल्याचे आढळून आल्याने प्रशासन जाणीवपूर्वक भेदभाव करत असल्याचा आरोप उपनगराध्यक्षांनी केला आहे.
“जोपर्यंत नगरपंचायत प्रशासकीय इमारतीची संपूर्ण स्वच्छता केली जात नाही, तोपर्यंत शहर स्वच्छ होऊ शकत नाही,” अशी भूमिका मांडत उपनगराध्यक्षांनी स्वच्छता न झाल्याच्या निषेधार्थ आपला कारभार नगरपंचायत आवारात सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आवश्यक सोयी-सुविधा प्रशासनाने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
एकीकडे स्वच्छतेच्या मुद्द्यावरून उपनगराध्यक्ष व विरोधी सदस्य आक्रमक झाले असताना, दुसरीकडे नगराध्यक्षांनी थेट कायदेशीर कारवाईचा मार्ग अवलंबल्याने नेवासा नगरपंचायतीतील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

