spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorizedज्युनिअर वकिलांना संधी द्यावी; कामकाज बंद म्हणजे वेळेचाअपव्यय – न्यायमूर्ती विभा कंकणवाडी

ज्युनिअर वकिलांना संधी द्यावी; कामकाज बंद म्हणजे वेळेचाअपव्यय – न्यायमूर्ती विभा कंकणवाडी

नेवासे न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन समारंभ….

न्यायालयाची नवी इमारत २४ महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश


नेवासे, दि. ८ (प्रतिनिधी) –
“ज्युनिअर वकिलांना अनुभवसंपन्न होण्यासाठी वरिष्ठ वकिलांनी संधी द्यावी. कोणत्याही घटनेसाठी न्यायालयीन कामकाज बंद ठेवणे म्हणजे वेळेचा अपव्ययच आहे,” असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती तथा नगर जिल्ह्याच्या पालक न्यायमूर्ती विभा कंकणवाडी यांनी केले.


नेवासे न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन समारंभात त्या बोलत होत्या. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रोहित जोशी, अहमदनगर जिल्हा व सत्र प्रभारी न्यायमूर्ती आशिष पाटील, नेवासे जिल्हा न्यायाधीश 1 व अतिरिक्त सत्र न्यायाधीश नेवासा सन्माननीय श्री एच. आर. वाघमारे,, मुंबई–गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष राजेंद्र उमाप, अमोल सावंत, नेवासे तालुका वकील संघाचे अध्यक्ष अजय रिंधे, जिल्हा कोर्ट प्रॅक्टिशनर बार असोसिएशनचे अध्यक्ष लक्ष्मण घावटे, आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, ज्ञानेश्वर संस्थानचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घले, माजी जिल्हा परिषद सदस्य विजया अंबाडे आदी मान्यवर उपस्थित होते.


न्यायमूर्ती कंकणवाडी म्हणाल्या की, न्यायालयाची इमारत उभी राहिल्यानंतर त्रुटी लक्षात येऊ नयेत, यासाठी बांधकामाच्या टप्प्यावरच काटेकोर लक्ष देणे गरजेचे आहे. इमारतीच्या दर्जा व गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही. नेवासे न्यायालयाची नवी इमारत २४ महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असून, ठरलेल्या कालावधीपूर्वी काम पूर्ण झाल्यास त्यास हरकत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यातील लोकअदालतींचे काम समाधानकारक असल्याचे नमूद


नेवासे ही संतांची पावनभूमी असून परिसर सुजलाम-सुफलाम असतानाही गुन्हेगारीचा आलेख वाढत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. वकील मंडळींनी न्यायदानाच्या प्रक्रियेत पूर्णपणे झोकून देऊन काम करावे. लोकअदालतीच्या माध्यमातून वादांचे त्वरित निराकरण झाल्यास वेळेची बचत होईल, असे सांगत त्यांनी नगर जिल्ह्यातील लोकअदालतींचे काम समाधानकारक असल्याचे नमूद केले.


न्यायालय परिसरात एखादी घटना घडल्यास वकिलांकडून कामकाज बंद ठेवले जाते; मात्र त्यामुळे पक्षकारांवर अन्याय होतो. संबंधित घटनेशी त्यांचा काहीही संबंध नसतानाही त्यांचा वेळ व खर्च वाया जातो. वकिलांना सन्मानाची वागणूक मिळणे आवश्यक असले तरी न्यायप्रक्रिया थांबू नये, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
उच्च न्यायालयातील कामकाज इंग्रजी भाषेत चालते. वकिलांची इंग्रजी भाषेवरील पकड कमकुवत असल्यास अडचणी निर्माण होतात. त्यामुळे ज्येष्ठ वकिलांनी नवोदित वकिलांना केसेस चालविण्याची संधी द्यावी. प्रत्यक्ष अनुभवातूनच कौशल्य आणि समृद्धी प्राप्त होते, असे मतही त्यांनी व्यक्त केले.


यावेळी न्यायमूर्ती रोहित जोशी, अतिरिक्त सत्र न्यायमूर्ती हरिभाऊ वाघमारे, राजेंद्र उमाप, अमोल सावंत, अजय रिंधे व लक्ष्मण घावटे यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन न्यायमूर्ती डॉ. प्रणिता सुगावकर व विधिज्ञ अनिता मोटे यांनी केले, तर आभार अतिरिक्त सत्र न्यायमूर्ती हरिभाऊ वाघमारे यांनी मानले.


कार्यक्रमास नायब तहसीलदार चांगदेव बोरुडे, मुख्याधिकारी निखिल फराटे, पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते तालुक्यातील व संपूर्ण जिल्ह्यातील वकील संघाचे सन्माननीय सदस्य तसेच न्यायिक अधिकारी, न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.live/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
overcast clouds
26.8 ° C
26.8 °
26.8 °
50 %
1.7kmh
98 %
Tue
37 °
Wed
38 °
Thu
35 °
Fri
36 °
Sat
35 °

Most Popular

error: Content is protected !!