spot_img
spot_img
Homeक्राइमअल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीस जन्मठेप

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीस जन्मठेप

नेवासा फाट्यावर लॉजवर केला नातेवाईक मुलीवरच केला अत्याचार



नेवासा :

अल्पवयीन मुलीला फुस लावून कायदेशीर पालकत्वातून पळवून नेत तिच्यावर इच्छेविरुद्ध पार्श्विक अत्याचार करणाऱ्या आरोपी ज्ञानेश्वर भास्कर तारडे (वय ४०, रा. सुरेगाव गंगा, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) यास मा. विशेष न्यायाधीश आर. आर. हस्तेकर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. हा निकाल बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (पोक्सो) व भारतीय दंड विधानाच्या कलमांन्वये देण्यात आला. सरकारपक्षातर्फे विशेष सरकारी वकील अॅड. देवा सयाजी काळे यांनी काम पाहिले.


प्रकरणातील हकिगत अशी की, पीडित मुलगी कॉलेजला शिक्षणासाठी स्कुटीवर ये-जा करीत असे. घटनेच्या दिवशी आरोपीने तिला कॉलेजला सोडण्याचे आमिष दाखवून मोटारसायकलवर बसविले; मात्र कॉलेजसमोर न थांबता तिला जबरदस्तीने दुसऱ्या गावी नेले. पीडितेने वारंवार विनवणी करूनही आरोपीने ऐकले नाही. नगर–औरंगाबाद महामार्गालगतच्या एका लॉजवर तिला नेऊन तिच्यावर बळजबरीने पार्श्विक अत्याचार केला. सायंकाळी कॉलेज सुटण्याच्या सुमारास आरोपीने तिला कॉलेजच्या मागील प्रवेशद्वाराजवळ सोडले. त्यानंतर पीडितेने आईला संपूर्ण घटना सांगितली.


या घटनेप्रकरणी पीडितेच्या आईने नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर गु. र. नं. ८०१/२०२२ अन्वये भा. दं. वि. कलम ३६३, ३६६(अ), ३७६, ३७६(२), ५०६ तसेच पोक्सो कायद्याच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचाही समावेश करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक मनोज मोंढे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात व उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके यांनी सखोल तपास करून लॉज चालक अक्षय यहुबा औताडे यास सहआरोपी करण्यात येत आवश्यक कागदोपत्री पुरावे संकलित करून दोषारोपपत्र विशेष न्यायालयात दाखल केले.


खटल्यादरम्यान सरकारपक्षाने एकूण बारा साक्षीदार तपासले. पीडित मुलगी, ग्रामीण रुग्णालय नेवासा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. बागवान, सिव्हिल रुग्णालय अहमदनगर येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. कटारिया, न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळा नाशिकचे अधिकारी, संबंधित कॉलेजचे प्राचार्य, पंच, तसेच तपासी अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. डीएनए अहवाल, वैद्यकीय तपासणी अहवाल, लॉज रजिस्टरमधील नोंदी व हस्ताक्षर तज्ज्ञांचा अहवाल, पीडितेचे वयाचे प्रमाणपत्र आणि कॉलेजमधील गैरहजेरी नोंद यांसारखे भक्कम पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यात आले.


युक्तिवाद ऐकून न्यायालयाने नमूद केले की, आरोपीवर पालकत्वाच्या भूमिकेतून संरक्षणाची जबाबदारी असताना त्याने पीडितेच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला आहे. आरोपी विवाहित असून त्यास पीडितेच्या वयाची अपत्ये आहेत, ही बाबही न्यायालयाने नोंदविली. हा गुन्हा अत्यंत गंभीर असून सहानुभूती दाखविण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावली.


न्यायालयाने आरोपीस पोक्सो कायदा कलम ४ अन्वये जन्मठेप व आजन्म सश्रम कारावास, भा. दं. वि. कलम ३६३ अन्वये ७ वर्षे सश्रम कारावास, तसेच कलम ५०६ अन्वये १ वर्ष सश्रम कारावास व ६ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा ठोठावली.


या खटल्यात विशेष सरकारी वकील अॅड. देवा सयाजी काळे यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नरेश चव्हाण, पोलीस कर्मचारी भगवान वाघमोडे व स्वाती तडुळकर हवालदार संजय माने मोढे साहेब एल सी बी हवालदार दराडे नेवासा पोलीस कर्मचारी सुमित करंजकर राम वैद्य संजय माने यांचे सहकार्य लाभले

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.live/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
overcast clouds
27.9 ° C
27.9 °
27.9 °
46 %
1.2kmh
100 %
Mon
28 °
Tue
36 °
Wed
38 °
Thu
37 °
Fri
36 °

Most Popular

error: Content is protected !!