आपल्या देशातील बाजारव्यवस्था अजूनही शास्त्रीय आणि पारदर्शक नाही. शेतमालाला योग्य हमीभाव, प्रक्रिया केंद्रे, साठवणूक व्यवस्था या गोष्टींचा अभाव आहे. अशा वेळी आयात खुली करणे म्हणजे घरचे झाले थोडे, व्याह्याने धाडले घोडे, अशीच परिस्थिती होईल,”– अशोकराव ढगे सर.
नेवासे
अमेरिकेने भारतासमोर पुन्हा एकदा शेतीमाल व्यापारात दबाव टाकण्याचा प्रयत्न केला असून भारतीय बाजारपेठ शेतीमालासाठी खुली करावी, असा आग्रह अमेरिकेने लावून धरला आहे. यासाठी ९ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली होती. ही मुदत संपत असताना, केंद्र सरकारपुढे मोठ्या पेचप्रसंग निर्माण झाला आहे.
अमेरिकेने मांडलेल्या नव्या मसुद्यानुसार, मका, सोयाबीन, गहू, तांदूळ, इथेनॉल, फळे-फुले आणि दुग्धजन्य उत्पादने भारतात कमी आयात शुल्कात स्वीकारावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. अमेरिकन मालावर भारताने आयात शुल्क कमी केल्यास त्याचा थेट फटका भारतीय शेतकऱ्यांना बसणार आहे, असा इशारा कृषी शास्त्रज्ञ डॉ. अशोकराव ढगे यांनी दिला आहे.
केंद्र सरकारने अमेरिकेच्या दबावाला बळी न पडता शेतकरीहिताची भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. भारतातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या दुर्बल असून त्यांना संरक्षण देणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने मिळून शेतकरी संरक्षण व संवर्धन कायदा लागू करावा, असेही त्यांनी नमूद केले.