नेवासा फाटा येथील कडा कॉलनी जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी
नेवासा प्रतिनिधी
: अकोळनेर (ता. अहिल्यानगर) येथील माजी सैनिक कै. मोहन गोविंद शेळके यांची नात आणि नेवासा तालुक्यातील शिक्षक कुटुंबातील श्रद्धा संजय शेळके हिची अमेरिकेतील नामांकित ओरॅकल कंपनीत सीनियर नेटवर्क ऑपरेशन्स इंजिनियर पदावर नियुक्ती झाली आहे. तिला कंपनीकडून वार्षिक 1 लाख 40 हजार यूएस डॉलर (सुमारे 1 कोटी 20 लाख रुपये) इतकं भरघोस पॅकेज देण्यात आलं असून, पुढील चार वर्षांत 1 लाख 50 हजार यूएस डॉलर किंमतीचे शेअर्सही गुंतवणुकीसाठी मिळणार आहेत.
श्रद्धाने नुकतीच अमेरिकेतील कॅन्सास स्टेटमधील पिट्सबर्ग युनिव्हर्सिटी येथून एम.एस. पदवी प्राप्त केली. तिच्या या दैदिप्यमान यशाबद्दल समाजातील सर्व स्तरांमधून तीचे अभिनंदन होत आहे. मराठी भाषिक, ग्रामीण भागातील विद्यार्थिनीने अमेरिकेसारख्या प्रगत देशात आपली बुद्धिमत्ता आणि जिद्द सिद्ध करून दाखवल्यामुळे ही नेत्रदीपक कामगिरी विशेष कौतुकास्पद ठरत आहे.
श्रद्धाचे प्राथमिक शिक्षण जि. प. प्राथमिक शाळा मुकुंदनगर (कडा कॉलनी), ता. नेवासा येथे झाले. तिचे वडील श्री. संजय शेळके हे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेत कार्यरत असून, सध्या नेवासा खुर्द, उस्थळ दुमाला, खरवंडी, घोडेगाव आणि शिंगवे तुकाई या केंद्रांचे केंद्रप्रमुख म्हणून सेवा देत आहेत. तिची आई श्रीमती रजनी आरेकर या आदर्श विद्यामंदिर, नेवासा येथे माध्यमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.
श्रद्धा हिच्या यशामुळे नेवासा तालुक्यातील ग्रामीण शिक्षणव्यवस्थेच्या गुणवत्तेचेही खणखणीत उदाहरण समोर आले असून, तिने अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी मार्ग तयार केला आहे.