पिचडगाव येथील माऊली आश्रमात विठ्ठल रुख्मिणी व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठासाठी संत महंतांच्या उपस्थितीत यज्ञ कुंडाचे पूजन
नेवास
: नेवासा तालुक्यातील पिचडगाव येथील माऊली आश्रमात विठ्ठल रुख्मिणी व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्त सुरू असलेल्या त्रिदिनात्मक सोहळ्याला देवगड येथील श्री दत्त मंदिर संस्थानचे महंत गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज, सदगुरू नारायणगिरी महाराज आश्रमाचे महंत श्री उद्धवजी महाराज मंडलिक, त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत श्री रमेशानंदगिरीजी महाराज यांनी भेट दिली. यावेळी उपस्थित संत महंतांच्या हस्ते येथे सुरू असलेल्या धार्मिक पूजेतील यज्ञ कुंडाचे पूजन करण्यात येऊन आहुती टाकण्यात आली. आपल्या धर्मासह श्री गुरूंबद्दल व देवाबद्दल असलेली श्रध्दा दृढ ठेवा असे आवाहन गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज यांनी यावेळी बोलतांना केले.
यावेळी झालेल्या संत महंतांच्या भेटी प्रसंगी टाळ मृदुंगाच्या गजरात माऊली आश्रमातील भाविकांच्या वतीने उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. मूर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्ताने १५ यजमानांच्या हस्ते सुरू असलेल्या धार्मिक पूजेप्रसंगी चौरंगावर मांडण्यात आलेल्या कलश व होम यज्ञ कुंडाचे पूजन गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज, गुरुवर्य श्री उध्दवजी महाराज मंडलिक, स्वामी रमेशानंद गिरीजी महाराज, आश्रमाचे प्रमुख ज्ञानेश्वर महाराज हजारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी झालेल्या धार्मिक कार्यक्रमाचे पौरोहित्य भेंडा येथील वेदशास्त्रसंपन्न आचार्य गणेशदेवा कुलकर्णी व हेमंतदेवा कुलकर्णी यांच्यासह ब्रम्हवृंद मंडळींनी केले.
यावेळी माऊली आश्रमात बसविण्यात येणाऱ्या विठ्ठल रुख्मिणी व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मूर्तीचे व प्राणप्रतिष्ठा होत असलेल्या स्थानाचे व कळसाचे पूजन गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज, महंत उद्धवजी महाराज व स्वामी रमेशानंदगिरी बाबांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित संत महंतांचा आश्रमाचे प्रमुख ज्ञानेश्वर महाराज हजारे यांच्या हस्ते संतपूजन करण्यात आले.
यावेळी सर्व संत मंडळींच्या वतीने बोलतांना गुरुवर्य भास्करगिरीजी म्हणाले की, मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने माऊली आश्रमात होणारी पूजा ही नास्तिक माणसाला देखील हात जोडायला लावील अशी आहे. मूर्तीच्या रूपाने भगवंत हे सगुण साकार होत असतात, संत आणि देव यांच्यात भिन्नता नसून त्यांचे स्वरूप एकच असल्याचे सांगत त्यांनी धर्माबद्दल, आपल्या श्री गुरूंबद्दल देवाबद्दल असलेली श्रद्धा दृढ अशी ठेवा असे आवाहन करून त्यांनी मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने शुभाशीर्वादरुपी शुभेच्छा दिल्या.
यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी संत सेवेकरी लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे, कल्याण महाराज पवार, राजेंद्र महाराज आसने, देवगड संस्थानचे सेवेकरी तात्या महाराज शिंदे, कृष्णा महाराज मोरे, गणेश महाराज शेजुळ, संतसेवक रामकृष्ण कांगुणे, भगवानराव शेजुळ, दत्तात्रय कांगुणे, संभाजीराव मते पाटील, बबनराव पवार, देवगड सेवेकरी संदीप साबळे, सरपंच पोपटराव हजारे, अंबादास गव्हाणे, आबा निपुंगे, सागर अनाप यांच्यासह पिचडगाव येथील सर्व संस्थेचे पदाधिकारी व ग्रामस्थ, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकार सुधीर चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले तर ज्ञानेश्वर महाराज हजारे यांनी उपस्थित संत महंतांसह भाविकांचे आभार मानले.
—–