वारकरी सेवा हीच खरे पांडुरंग सेवा ,वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान हेच या उपक्रमाचे यश!
!
वारकरी सेवा हेच खरे पांडुरंगसे वावारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान हेच या उपक्रमाचे यश!
नेवासा (प्रतिनिधी) – भक्तीची गडद छाया, टाळ मृदुंगाचा गजर आणि हरिनामाच्या गजरात चालणाऱ्या आषाढी वारीत “सेवा हीच ईश्वर सेवा” या तत्त्वाला आत्मदीप मेडिकल फाऊंडेशनने साजेसा न्याय दिला आहे. राष्ट्रसंत गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनाखाली तब्बल १२,००० वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी आणि औषधवाटपाचा उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात आला.
या उपक्रमाने वारकरी बांधवांच्या थकवलेल्या पायांना आधार दिला, अन् भक्तीरसात रंगलेल्या या पायी चालणाऱ्या दिंड्यांना खरी सेवा कशी असावी याचा वस्तुपाठच घालून दिला.
देवगडफाटा, माळीचिंचोरा फाटा व पंढरपूर येथील देवगड मठ परिसरात तीन टप्प्यांत झालेल्या या आरोग्य तपासणी शिबिरात अनुभवी डॉक्टरांच्या चमूने मनापासून सेवा बजावली. डॉ. अविनाश काळे यांच्या नेतृत्वाखाली हृदयरोग, दाह, थकवा, दमा, सर्दी-खोकला अशा विविध तक्रारींसाठी तपासणीसह मोफत औषध वाटप करण्यात आले.
शिबिरास पंढरपूर येथे स्वामी प्रकाशानंदगिरीजी, स्वामी रामगिरीजी, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार अमोल खताळ, सभापती रामजी शिंदे, आमदार समाधान आवतडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट देऊन कौतुकाचा वर्षाव केला. “ही केवळ आरोग्य तपासणी नव्हे, तर हजारो भाविकांच्या आरोग्यरक्षणासाठीचे अनमोल योगदान आहे,” असे गौरवोद्गार यावेळी व्यक्त झाले.
या सेवेत डॉ. किरण ढगे, डॉ. पार्थ मरकड, डॉ. प्रियंका कव्हळे यांच्यासह अनेक वैद्यकीय तज्ञांनी योगदान दिले. अटल बिहारी वाजपेयी होमिओपॅथी कॉलेज आणि शिवाजीराव पवार आयुर्वेद कॉलेजने डॉक्टरांची टीम देत सहकार्य केले, तर पंचगंगा उद्योग समुहाचे प्रभाकरराव शिंदे यांनी रुग्णवाहिकेची व्यवस्था करून साथ दिली.
वारकऱ्यांच्या सेवेत झिजलेले आत्मदीप फाऊंडेशनचे सर्व सदस्य, कर्मचारी, सिस्टर स्टाफ यांचे कौतुक शब्दांत मावणार नाही. हा उपक्रम हेच दाखवून देतो की, भक्ती आणि सेवा एकत्र आली की ती वारी केवळ पंढरपूरपुरती मर्यादित राहत नाही, तर ती मनात घर करून जाते.