“शेतीत नफा मिळवायचा असेल, तर निर्यातक्षम माल उत्पादन हेच प्रभावी माध्यम आहे. शिंदे बंधूंचा प्रयोग इतर शेतकऱ्यांनी अवश्य अनुकरण करावा.”
– डॉ. अशोकराव ढगे, कृषी शास्त्रज्ञ
नेवासा (अहिल्यानगर प्रतिनिधी) –
शेतीतील उत्पन्न वाढीसाठी स्थानिक बाजारपेठेपुरती मर्यादा न ठेवता निर्यातक्षम उत्पादन घेणे ही काळाची गरज आहे. नेवासा तालुक्यातील चिंचबन येथील प्रगतशील शेतकरी भाऊसाहेब शिंदे, ॲड. संदीप शिंदे आणि सौ. मनीषा शिंदे यांनी हे वास्तव ओळखून आपल्या केळीच्या उत्पादनाचा दर्जा उंचावत थेट इराणपर्यंत केळीची यशस्वी निर्यात केली आहे. त्यांच्या या प्रयत्नाचे कृषी तज्ज्ञ आणि शेतकरी वर्गातून जोरदार कौतुक होत आहे
शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीतून पुढे येऊन, स्थानिक मर्यादा झुगारून जागतिक बाजारपेठ गाठली तर शेती नक्कीच फायदेशीर ठरू शकते. शिंदे बंधूंचा अनुभव हेच सांगतो की, निर्यातक्षम दर्जेदार उत्पादन व योग्य मार्गदर्शन यांच्या मदतीने शेतीत नफा हे स्वप्न नसून वास्तव ठरू शकते.– संजयराव खर्डे
शिंदे बंधूंनी ‘राजनशाही’ या निर्यातक्षम केळी जातीची निवड करून, अत्यंत काटेकोर नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्पादन घेतले. त्यांनी सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा संतुलित वापर केला. पाण्यासाठी ठिबक सिंचन पद्धत, आंतरमशागत तंत्रज्ञान, तसेच रोग-कीड नियंत्रणासाठी जैविक उपाययोजना यांचा परिणामकारक वापर करण्यात आला
एका एकरातून त्यांनी सरासरी २५ ते ३० टनांचे उत्पादन घेतले, तर उत्पादनासाठी एकरी ९० हजार ते १ लाख रुपये खर्च आला. त्यातून त्यांना ५.५ ते ६ लाख रुपये उत्पन्न मिळाले. म्हणजेच एका एकरातून चार ते पाच लाख रुपयांचा निव्वळ नफा त्यांनी कमावला.
या केळीचा दर्जा पाहून पुण्यातील ‘अप्सर भाई’ निर्यातदार संस्थेच्या माध्यमातून थेट इराणमध्ये निर्यात करण्यात आली. फळाची गुणवत्ता, गोडी, पोत आणि साठवणूकक्षम क्षमता यामुळे इराणी बाजारात त्याला चांगली मागणी लाभली.
शेतमालाला स्थानिक बाजारपेठांमध्ये मिळणारा दर अपुरा असून, निर्यात हे उत्पन्नवाढीचे प्रभावी माध्यम ठरू शकते. याचे जिवंत उदाहरण शिंदे बंधूंनी घालून दिले आहे. त्यांच्याप्रती कृषी शास्त्रज्ञ डॉ. अशोकराव ढगे, प्रगतशील शेतकरी संजय खर्डे आणि श्री.जनार्धन काकडे पाटील यांनी समाधान व्यक्त करत त्यांच्या कार्याचे विशेष कौतुक केल
या यशस्वी उपक्रमामुळे चिंचबन गावाचा शेतकरी वर्ग प्रेरित झाला असून, इतर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्येही निर्यातक्षम शेतीविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. शिंदे कुटुंबाने केवळ स्वतःचा आर्थिक लाभ वाढवला नाही, तर एक नवा शेतीचा मार्ग उभा केला आहे.
- ******राजनशाही केळी*******
उत्पादन : २५-३० टन/एकर
उत्पादन खर्च : ९० हजार ते १ लाख/एकर
उत्पन्न : ५.५ ते ६ लाख/एकर
निर्यात माध्यम : अप्सरभाई, पुणे
बाजार : इराण
तंत्रज्ञान : ठिबक सिंचन, जैविक कीडनियंत्रण, संतुलित खत वापर