विद्यार्थ्यांनी मेहनतीने अभ्यास करून उज्ज्वल भविष्य घडवावे- एकनाथराव नांदे
नेवासे
नागेबाबा परिवाराच्या प्रवरासंगम शाखेत संस्थापक चेअरमन कडू भाऊ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली दहावी व बारावी परीक्षेत उज्वल यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमासाठी सिद्धेश्वर विद्यालयाचे प्राचार्य मा. तमणर सर आणि पोटे सर, तसेच एरिया डेव्हलपमेंट ऑफिसर एकनाथ नांदे सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन नागेबाबा परिवाराच्या वतीने गौरविण्यात आले.
एकनाथ नांदे सर यांनी संस्थेच्या सामाजिक, शैक्षणिक व ग्रामीण विकासासाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. त्यांनी विद्यार्थ्यांनी मेहनतीने अभ्यास करून उज्ज्वल भविष्य घडवावे, असे सांगत संस्थेच्या वतीने त्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे संयोजन व सूत्रसंचालन सुभाष पठारे सर यांनी प्रभावीपणे केले. यावेळी पहरे सर यांनीही आपले मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन योगेश भागवत सर यांनी केले.
कार्यक्रमाला शिक्षक, पालक, ग्रामस्थ आणि नागेबाबा परिवाराचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.