नेवासा
गोगलगाव ते मंगळापूर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आमदार विठ्ठलराव लंघे यांची सकारात्मक भूमिका; ग्रामस्थांत आनंदाचे वातावरण
नेवासा तालुक्यातील गोगलगाव ते मंगळापूर दरम्यानचा रस्ता गेल्या दोन दशकांपासून अत्यंत खराब अवस्थेत असून, स्थानिक ग्रामस्थांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत होत्या. या रस्त्याकडे याआधीच्या लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे रस्ता खड्ड्यांनी भरलेला असून पावसाळ्यात प्रवास अधिकच कष्टदायक होतो.

हा रस्ता हायवेवरून थेट संभाजीनगर व अहिल्यानगरला जोडणारा असल्याने रहदारी मोठ्या प्रमाणात आहे. शालेय विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी आणि रुग्णवाहिकांना देखील या रस्त्यामुळे त्रास सहन करावा लागत होता.
गोगलगाव व मंगळापूर ग्रामस्थांनी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अनेक वेळा निवेदने देत मागणी लावून धरली. या मागणीची दखल घेत लोकप्रिय आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी स्वतः पुढाकार घेत रस्त्याच्या दुरुस्तीबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे.
लवकरच काम सुरू होणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले. आमदार लंघे यांच्या या भूमिकेमुळे ग्रामस्थांतून समाधान व आनंद व्यक्त होत असून रस्ता सुस्थितीत झाल्यास परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
