वाकडीतील प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये संताप; दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा
नेवासा (प्रतिनिधी) – वाकडी (ता. नेवासा) येथे सरकारी रेशनवरील तांदूळ आणि गहू काळ्या बाजारात विक्रीसाठी नेत असताना ग्रामस्थांनी ३६ गोण्या धान्य पकडून पुरवठा विभाग आणि पोलिसांच्या हवाली केले. हा प्रकार स्पष्टपणे गंभीर स्वरूपाचा असूनही पुरवठा विभागाने अद्याप संबंधित दुकानदाराचा परवाना रद्द केला नाही की दोषींवर ठोस कारवाई केली नाही, यामुळे ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते संतप्त झाले आहेत.
हा प्रकार दिवसा घडला. विठ्ठल काळे, विजय बनकर, विकास काळे व उत्तम कार्ले या जागरूक ग्रामस्थांनी वाहन अडवून सदर घडामोड तहसीलदारांना कळवली. त्यानंतर प्रशासनाने धान्य, टेम्पो व आरोपी ताब्यात घेतले, तरीदेखील पुरवठा विभागाकडून अंमलबजावणीत ढिलाई दिसून आली. दोषींवर त्वरीत कठोर कारवाई होणे अपेक्षित असताना अद्याप केवळ पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यापुरतेच पावले उचलली गेली आहेत.
गोरगरीब रेशनधारकांसाठी केंद्र शासनाने मोठ्या प्रमाणात तांदूळ आणि गहू मोफत देण्याची योजना राबवली आहे. मात्र, या योजनेंतर्गत आलेले धान्यच दुकानदाराकडून काळ्या बाजारात जात असल्याचा प्रकार धक्कादायक आहे. या गंभीर प्रकरणात पुरवठा निरीक्षकांनी केवळ पंचनामा करून जबाबदारी झटकणे, हा प्रकार संशयास्पद ठरत आहे.
“आम्ही स्वतः आरोपी पकडून दिला, धान्य व टेम्पो ताब्यात दिला. पण पुरवठा विभागाने फक्त पंचनामा करून मोकळे झाले. परवाना कधी रद्द होणार? अजूनही हे दुकान सुरुच राहणार असेल तर यामागे मोठा राजकीय आशीर्वाद असावा,” अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
याप्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकारी, तहसीलदार आणि नेवासा पोलीस यांच्याकडून समन्वयाने कारवाई न झाल्यास ग्रामस्थांनी दुकानासमोर ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
“गोरगरीबांच्या तोंडचे अन्न चोरी करणाऱ्यांना माफ नाही. यंत्रणेने आता तरी जागे व्हावे!” – असा रोष गावभर व्यक्त होत आहे.