नेवासा (प्रतिनिधी) – कै. सुंदरबाई हिरालाल गांधी कन्या विद्यालय, नेवासा येथील दहावीच्या २२विद्यार्थिनींच्या भविष्याशी शाळेच्या व्यवस्थापनाने गंभीर खेळ मांडल्याचे उघडकीस आले आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थिनींच्या गुणपत्रकात चित्रकला (Elementary) विषयाचे वाढीव गुण नोंदवले गेलेच नाहीत!
दि. १३ मे २०२५ रोजी निकाल जाहीर झाला, मात्र त्यामध्ये या विषयाचे वाढीव गुणच गायब असल्याचे स्पष्ट झाले. विद्यार्थिनींच्या म्हणण्यानुसार, संबंधित चित्रकला शिक्षिकेने हे गुण महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांना सादर केलेलेच नाहीत. यामुळे अनेक विद्यार्थिनींच्या अंतिम टक्केवारीवर प्रतिकूल परिणाम झाला.
निकालानंतर सात दिवसांत हरकत घेणे बंधनकारक असतानाही, शाळेच्या मुख्याध्यापिका, चित्रकला शिक्षिका व वरिष्ठ लिपिक यांनी वेळेत कोणतीही तक्रार किंवा प्रक्रिया मंडळाकडे केलेली नाही. ही व्यवस्थापनाची दुसरी चूक त्यामुळे हा प्रकार अधिक गंभीर मानला जात आहे.
विद्यार्थिनींनी व त्यांच्या पालकांनी वारंवार चौकशी केल्यावर शाळेतील कर्मचाऱ्यांनी एकमेकांकडे जबाबदारी ढकलत हा प्रकार दाबून टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
या प्रकारामुळे विद्यार्थिनींच्या शैक्षणिक हक्काचा स्पष्टपणे भंग झाला असून, शाळेच्या कार्यकारी मंडळाने याबाबत खुलासा करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी, अशी विद्यार्थिनी व पालकांची जोरदार मागणी आहे.
शाळेच्या निष्काळजी कारभारामुळे नुकसान झालेल्या विद्यार्थिनींना न्याय मिळावा आणि त्यांच्या गुणांची दुरुस्ती करून त्यांचा निकाल पुनर्परीक्षित करावा, अशी मागणी जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांकडेही करण्यात आली आहे.
सदरच्या विद्यार्थिनींच्या पालकांनी शिक्षण विभागाकडे तक्रार करून दाद मागितली आहे यावर शिक्षण विभागाने या संस्थेस नोटीस दिली असून पुढील कारवाईसाठी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाकडे तक्रार अर्ज पाठवलेला आहे —गटशिक्षणाधिकारी – साईलता सामलेटी
.