वाढदिवसानिमित्त शंकरराव गडाख यांचा सामाजिक उपक्रमांनी युक्त उत्सव; सोनईत जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद
नेवासा
“जिवाभावाची माणसं आणि कार्यकर्त्यांचे प्रेम हीच माझी खरी ऊर्जा आहे. सत्ता असो वा नसो, मी सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध आहे,” असे प्रतिपादन माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.
२९ मे २०२५ रोजी, त्यांच्या वाढदिवसानिमित्त नेवासा तालुक्यातील सोनई आणि परिसरात विविध सामाजिक उपक्रम, साधूसंतांचे मार्गदर्शन आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहात हा दिवस साजरा करण्यात आला.
वांजोळी (ता. नेवासा) येथे शंकरराव गडाख मित्रमंडळाच्या वतीने तसेच घोडेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. ग्रामीण भागातील रुग्णांसाठी डॉ. बाबासाहेब शिरसाठ (सोनई) यांच्या फिरत्या दवाखान्याचे लोकार्पणही याच दिवशी गडाख यांच्या हस्ते झाले. यासोबतच विविध रुग्णालयांमध्ये रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास उपस्थित राहून आशीर्वाद व शुभेच्छा देणाऱ्या संत-महंतांमध्ये देविदास महाराज म्हस्के सुनीलगिरी महाराज महंत आवेराज महाराज पंढरीनाथ महाराज तांदळे रमेशानंदगिरी महाराज ज्ञानेश्वर महाराज तांबे के. एम. बाबा फाटके नामदेव महाराज कोरडे ब्रह्मकुमारी उषादिदी चा समावेश होता.
सकाळी ९ ते दुपारी १.३० या वेळेत विविध गावांमधून कार्यकर्ते, पत्रकार ,शेतकरी, शेतमजूर, समाजसेवक, महिला मंडळ, युवक तसेच स्थानिक संस्था आणि विविध मंडळांचे प्रतिनिधी यांनी शंकरराव गडाख यांचे अभिष्टचिंतन करून शुभेच्छा दिल्या.
वाढदिवसाच्या दिवशी शंकरराव गडाख यांच्या सोनई येथील जनसंपर्क कार्यालयात हजारो नागरिकांनी भेट दिली. राहुरी-शिंगणापूर रस्त्यावर काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. महायुतीच्या लाटेत विधानसभेचा पराभव झाल्यानंतरही एवढ्या मोठ्या प्रमाणात जनसमुदायाने उपस्थित राहणे, ही गडाख यांच्या जनसंपर्काची व लोकप्रियतेची जिवंत साक्ष ठरली.
राजकीय नेत्यांकडून सोशल मीडियावरून शुभेच्छांचा वर्षाव गडाख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवरांनी सोशल मीडियावरून संदेश पाठवले. त्यामध्ये आमदार आदित्य ठाकरे खासदार ओमराजे निंबाळकर आमदार धीरज देशमुख आमदार कैलास पाटील यांच्यासह जिल्ह्यातील अनेक पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या.
मा नामदार गडाख यांचे आभार —पावसाचे वातावरण असूनही इतक्या मोठ्या प्रमाणात तुम्ही उपस्थित राहता, हीच माझ्या कामाला मिळणारी सर्वात मोठी पावती आहे,” असे म्हणत शंकरराव गडाख यांनी सर्व कार्यकर्त्यांचे व शुभेच्छुकांचे आभार मानले.