माझ्यासाठी पर्यावरण दिन रोजच- सुनील गोन्टे:
घोडेगाव **दिलीप शिंदे याज कडून **
फक्त वृक्षारोपण करून थांबणे हे पर्यावरणप्रेम नसून, त्या झाडांचं संगोपन हे खरी जबाबदारीचं काम आहे. ही जबाबदारी गेली १३ वर्षे प्रामाणिकपणे पार पाडणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे नेवासा तालुक्यातील घोडेगावचे सुनिल गोन्टे. झाडं हेच जीवन मानणाऱ्या या ‘वृक्षमित्रा’ने पर्यावरणासाठी झाडांशी आयुष्याचं नातं जोडलं आहे
.२०११ साली वृत्तपत्रात जागतिक पर्यावरण दिनाची बातमी वाचली आणि त्यांच्या वृक्षप्रेमाला नवसंजीवनी मिळाली. त्यांनी गावातील सार्वजनिक ठिकाणी झाडे लावण्याचा संकल्प केला आणि तो आजतागायत अविरतपणे सुरू आहे.
ग्रामपंचायत, शाळा, मंदिर, अमरधाम, रस्ते किनारे अशा विविध ठिकाणी त्यांनी स्वतः खड्डे खोदून झाडांची लागवड केली. त्यांनी आजवर २५० हून अधिक झाडे स्वतः लावली असून, ७०० ते ८०० झाडांचे मोफत वाटप करत इतरांनाही या मोहिमेत सहभागी करून घेतले.
गोन्टे यांनी लावलेल्या झाडांमध्ये गुलमोहर, वड, चिंच, कडुलिंब, करंज, आंबा, अशोक, जांभूळ, शिसम, हिरडा, बेहडा अशी विविध देशी झाडे आहेत. ही झाडे वाढतात, बहरतात आणि उन्हात सावली देतात – पण गारवा त्यांच्या मनात निर्माण होतो, असे ते आवर्जून सांगतात.
ते झाडांची फक्त लागवड करत नाहीत, तर गवत काढणे, पाणी घालणे, जाळ्या बसवणे यासाठी स्वतःच्या दुचाकीवर ड्रम घेऊन जातात. झाडांसोबत नातं जपण्याची ही जाणीव अनेकांना प्रेरणा देणारी आहे.
“शासनाचा कार्यक्रम म्हणून नाही, तर भावनिक बांधिलकी म्हणून दररोज एक झाड लावा,” असा संदेश देत पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन वृक्षप्रेमी सुनिल गोन्टे यांनी केले आहे.