नेवासा
अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर हा सुमारे 120 किलोमीटरचा राज्य महामार्ग ग्रामीण व शहरी भागांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता असून यावरून दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते. परंतु या महामार्गावरील नेवासा ते अहिल्यानगर दरम्यानच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे. पूर्वी या मार्गावर अहिल्यानगर परिसरात एक टोल नाका कार्यरत होता, मात्र काही वर्षांपूर्वी तो बंद करण्यात आला. टोल बंद झाल्यानंतर रस्त्याची देखभाल थांबली असून सध्या हा मार्ग अक्षरशः अपघातांचा सापळा बनलेला आहे.
या टोल नाक्याच्या बंदीनंतर ना ठेकेदाराने जबाबदारी घेतली, ना प्रशासनाने लक्ष दिले. पावसाळ्यात तर या रस्त्यावर इतके मोठे खड्डे पडले आहेत की रस्त्याचे मूळ स्वरूप ओळखू येत नाही. वडाळा ते घोडेगाव आणि पुढे अहिल्यानगर दरम्यान दर काही अंतरावर मोठे खड्डे असून ते वाहनांना तांत्रिक हानी पोहोचवत आहेत. प्रवाशांना पाठदुखी, मानदुखी यांसारख्या शारीरिक तक्रारी होतीलच
घोडेगाव परिसरात गावाच्या मुख्य रस्त्यावर वर्षानुवर्षे खड्डे आहेत. स्थानिक माध्यमांनी वेळोवेळी या खड्ड्यांच्या बातम्या प्रकाशित केल्या, निवेदनेही दिली गेली, पण रस्ता तसाच राहिला. वाहनचालकांना याच रस्त्यावरून प्रवास करताना गाडी वळवण्यासाठी अक्षरशः कसब लावावे लागते.

टोल बंद असला तरी देखभाल करण्याची जबाबदारी संपुष्टात जात नाही. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे नियमानुसार, टोल बंद झाल्यानंतर संबंधित विभागाने निधीच्या आधारे देखभाल करणे आवश्यक असते. काही भागांमध्ये ही जबाबदारी महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (MSRDC) कडे तर काही ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असते. मात्र नेमकी जबाबदारी कुणाची हे स्पष्ट न झाल्याने रस्ता दुर्लक्षित राहिला आहे.

या मार्गाच्या दुसऱ्या टोकाला म्हणजे वडाळा ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान दोन टोल नाके कार्यरत आहेत. त्यामुळे या भागातील रस्ता त्यामानाने व्यवस्थित आहे, खड्डे अत्यल्प आहेत. यावरून स्पष्ट होते की जेथे टोल सुरू आहे, तेथे देखभाल व्यवस्थित केली जात आहे. मग टोल नसलेल्या भागात नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कुणी घ्यायची?
पुणे छत्रपती संभाजीनगर हा रस्ता विदर्भ मराठवाड्याला जोडणारा तसेच नेवासा, शेवगाव, पाथर्डी, वैजापूर आदी तालुक्यांतील नागरिकांसाठी प्रमुख दळणवळण मार्ग आहे. याच मार्गावरून रुग्णवाहिका, शालेय वाहने, शेतमालाची वाहतूक, दूध संकलन आदी सेवा चालतात. त्यामुळे याकडे शासनाने विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. दरवर्षी रस्ता डागडुजीच्या नावाखाली लाखो रुपये मंजूर होतात, पण प्रत्यक्षात काम होताना दिसत नाही.
चौकट—-
अहिल्यानगर ते नेवासा दरम्यानचा महामार्ग रस्ता तातडीने डांबरीकरण करून खड्डेमुक्त करण्यात यावा. संबंधित यंत्रणेने जबाबदारी स्वीकारून निधीची तरतूद करावी. रस्त्याची वारंवार तपासणी होऊन दीर्घकालीन उपाययोजना राबविण्यात याव्यात. अन्यथा मोठा अपघात होऊन जीवितहानी झाल्यास त्यास जबाबदार कोण, हा प्रश्न उपस्थित राहील – देविदास साळुंके सामाजिक कार्यकर्ता