
नेवासा (प्रतिनिधी) – अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे माजी अध्यक्ष आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू स्व. डॉ. मोहनराव हापसे (तात्या) यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त नेवासा येथे आयोजित श्रद्धांजली कार्यक्रम भावपूर्ण वातावरणात पार पडला.
दिनांक ४ फेब्रुवारी २०२५ रोजी ज्ञानोदय इंग्लिश स्कूल, नेवासा येथे झालेल्या कार्यक्रमात ह. भ. प. उद्धव महाराज मंडलिक यांनी डॉ. हापसे यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव करत भावस्पर्शी प्रवचन केले. “मरणानंतरही माणसाने आपल्या कार्यातून जिवंत राहावं, असं जीवन तात्यांचं होतं,” असे ते म्हणाले.
कार्यक्रमाला माजी आमदार पांडुरंग अभंग, विद्यमान आमदार विठ्ठलराव लंघे, जिल्हा मराठा संस्थेचे सचिव ॲड. विश्वासराव आठरे पा., खजिनदार ॲड. दीपलक्ष्मी म्हसे, ॲड. अलकाताई जंगले, डॉ. विद्या शिर्के, प्राचार्य शिवाजीराव देवढे, प्राचार्य लक्ष्मणराव मतकर यांच्यासह जिल्हा व राज्यातील विविध क्षेत्रातील माजी विद्यार्थी आणि पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्धव महाराज नेवासेकर पुढे म्हणाले की तात्यांनी नेवासा व परिसरातील ग्रामीण भागात शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून शिक्षणाचा प्रसार केला. अनेक शाळा सुरू करून ग्रामीण व बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी उच्च पदांवर पोहोचले, तर अनेकांना नोकरी देऊन त्यांनी त्यांचा प्रपंच उभा केला.
कार्यक्रमाच्या सांगता पसायदानाचे पठण करण्यात आले. यावेळी त्यांच्या पत्नी श्रीमती विजयाताई हापसे, मुलगा शंतनू, मुली व नातवंडे उपस्थित होते. अहमदनगर जिल्हा मराठा संस्थेचे अनेक आजी-माजी सेवकही या वेळी उपस्थित राहून तात्यांना अभिवादन केले.
—