अक्षय ची सलग दुसऱ्यां वर्षी ची निवड
नेवासा (प्रतिनिधी):
श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयातील युवा नेतृत्व अक्षय खाटीक यांची २०२५ मध्ये दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय युवा परिषदेसाठी पुन्हा एकदा निवड झाली आहे. ही निवड देशभरातील निवडक विद्यार्थ्यांमधून झाली असून, अक्षय खाटीक यांची सलग दुसऱ्यांदा निवड होणे ही तालुक्यासाठी आणि जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब आहे.
दि. ५ ते ७ ऑगस्ट २०२५ दरम्यान दिल्लीतील महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे होणाऱ्या या परिषदेत देशभरातील युवक सहभागी होणार आहेत. यामध्ये केंद्रीय मंत्री, प्रशासकीय अधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
या राष्ट्रीय युवा परिषदेमध्ये युवांना – नेतृत्व विकास,शिक्षण,सामाजिक बांधिलकी,कौशल्य विकास,धोरणनिर्मितीया विषयांवर संवाद साधता येणार आहे. याशिवाय, संसदसदृश चर्चासत्रात सहभागी होण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
यावेळी सहभागी युवकांना संसद भवन, राष्ट्रपती भवन, गृह मंत्रालय, अर्थ मंत्रालय यासारख्या अनेक राष्ट्रीय महत्त्वाच्या ठिकाणांची भेट आणि लोकसभा अधिवेशन प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळणार आहे.
अक्षय खाटीक यांची निवड त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सामाजिक बांधिलकीच्या कार्यामुळे, नेतृत्वगुणांमुळे आणि मागील अधिवेशनातील प्रभावी सहभागामुळे करण्यात आली आहे.

त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवर्ग, मित्रपरिवार व ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.