आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या पत्नींच्या हस्ते ५५ लाखां रुपयांच्या कृत्रिम अवयवांचे मोफत वाटप
नेवासा (प्रतिनिधी) –
“स्वावलंबनाची वाट दिव्यांगांसाठी खुली झाली,” असा विश्वास देणाऱ्या एका हृदयस्पर्शी उपक्रमाचे आयोजन नेवासा फाटा ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या प्रेरणेतून आणि त्यांच्या पत्नी सौ. रत्नमालाताई लंघे यांच्या हस्ते दिव्यांग लाभार्थ्यांना सुमारे ५५ लाख रुपये किंमतीचे ‘जयपूर फूट’ कृत्रिम हात, पाय, कॅलिपर्स वाटप करण्यात आले.
या शिबिरात जिल्ह्यातील विविध भागांतून आलेल्या शारीरिकदृष्ट्या अपंग बांधवांना कृत्रिम हात, पाय व कॅलिपर्स यांचे मोजमाप घेऊन तत्काळ वितरण करण्यात आले. विशेष म्हणजे या उपकरणांची किंमत असूनही लाभार्थ्यांना कोणतीही आर्थिक जबाबदारी न देता मोफत सेवा देण्यात आली.
शिबिराचे आयोजन पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या दिव्यांग पुनर्वसन केंद्र, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय, जिल्हा परिषद अहमदनगर, एलिम्को कानपूर व एस. आर. ट्रस्ट, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
या उपक्रमाने दिव्यांगांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले तर त्यांच्या आत्मविश्वासातही लक्षणीय वाढ झाली. अनेकांनी अश्रुपूर्ण डोळ्यांनी आभार मानत सांगितले, “आज आमच्या पायांना अर्थ मिळाला.”
दिव्यांग व्यक्ती ही सहानुभूतीचे नव्हे तर सशक्ततेचे प्रतीक बनावे यासाठी हा उपक्रम राबवित आहोत ,दिव्यांग व्यक्तीला सहाय्य झाले तर तेही उंच भरारी घेऊ शकतात –सौ रत्नमाला लंघे
या उपक्रमामुळे लंघे दांपत्याचे सामाजिक भान आणि माणुसकीच्या जाणिवेचे पुन्हा एकदा कौतुक होत आहे. नेवासा तालुक्यातील अशा उपक्रमांमुळे ‘दिव्यांग’ हा शब्द आता ‘दिव्य-अंग’ म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य तेजश्रीताई लंघे, तालुका अध्यक्ष प्रताप चिंधे, लोखंडे, युवा नेते ऋषिकेश शेटे,मनोज पारखे, भाजपा महिला आघाडीच्या अमृताताई नळकांडे, मनीषाताई वाघ,भारतीताई बेंद्रे, शोभा आलवणे,सौ.भारती कर्डक,,आरोग्य अधिकारी डॉ.दीपक डिंबर, डॉ. मोहसिन बागवान, डॉ.अविनाश काळे, ,बाळासाहेब पिसाळ,सतीश शिरसागर आदी मान्यवर उपस्थित होते