
(नेवासा प्रतिनिधी) – नेवासा नगरपंचायतीचा कारभार बिनधास्त, बेशिस्त आणि रामभरोसे सुरू आहे. दोन महिन्यांपासून मुख्याधिकारी कार्यालयात हजेरी लावत नसल्याने संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या खुर्चीला हार घालून आंदोलन केलं.
गेल्या दोन वर्षांपासून नगरपंचायतीला पूर्णवेळ मुख्याधिकारी नाही. अध्यक्ष नाहीत, नगरसेवक नाहीत. कर्मचाऱ्यांवर कोणताही अंकुश नाही. परिणामी शहरातील पाणी, गटारी, स्वच्छता, मोकाट जनावरे यांसारखे प्रश्न विकोपाला गेले आहेत. नागरिकांची अवस्था अर्धमरणात आली आहे, पण प्रशासन झोपेत आहे.
दोन महिन्यांपूर्वी शेवगाव नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी विजया घाडगे यांची प्रभारी नियुक्ती झाली; मात्र त्या एकदाही कार्यालयात आल्या नाहीत! काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी केलेला आहे व हे बेजबाबदार वागणे नागरिकांची चेष्टा करण्यासारखे आहे, असाही आरोप काँग्रेसने केला.
आज शहर काँग्रेसचे पदाधिकारी नगरपंचायतीत गेले असता मुख्याधिकारी अनुपस्थित आढळल्याने त्यांनी त्यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी आंदोलन छेडले. यावेळी काँग्रेस नेते संभाजी माळवदे म्हणाले, “नगरपंचायतीच्या स्थापनेनंतर जी विकासाची स्वप्ने दाखवली गेली, ती धुळीस मिळाली आहेत. प्रशासन लोकांना वाऱ्यावर सोडत आहे. असा बेजबाबदार अधिकारी पदावर राहण्यास पात्र नाही.”
या आंदोलनात गणपत मोरे (स्वाभिमानी संघटना), त्रिंबक भदगले (शेतकरी संघटना), गुलाब पठाण, असिफ पटेल, संजय होडगर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
चौकट:
“नेवासा शहर आज बिनपदाधिकारी, बिनअधिकारी असून लोकशाहीचा अपमान होत आहे. कर्मचाऱ्यांच्या मनमानीला जनता कंटाळली आहे. जनतेने आता योग्य नेतृत्वाची निवड करून सक्षम पर्याय द्यावा.”
– अंजुम पटेल, शहराध्यक्ष