कामगार हक्कासाठी आणि बनावट नोंदणीमुळे बुडालेल्या योजनांचा न्याय मिळवण्यासाठी समर्पण फाउंडेशनची लढाई निर्णायक टप्प्यावर!
नेवासे
अहिल्यानगर जिल्ह्यातील कामगार कार्यालयात बनावट बांधकाम कामगार नोंदणीचा सुळसुळाट वाढत असून, खऱ्या कामगारांना त्यांच्या हक्काच्या योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. दलालांच्या संगनमताने बनावट नावांची नोंदणी करून शासनाच्या योजनांचा गैरवापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वारंवार लक्ष वेधूनही प्रशासनाकडून केवळ दुर्लक्षच झाल्याचे समोर येत आहे. यामुळे कामगारांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, आता समर्पण फाउंडेशनने बेमुदत घंटानाद आंदोलनाची हाक दिली आहे.
सोमवार दिनांक ३० जून २०२५ पासून जिल्हा कामगार कार्यालय, अहिल्यानगर येथे हे आंदोलन सुरू होणार असून, जोपर्यंत बनावट कामगार नोंदणी करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा देण्यात आला आहे. दलालांच्या या कारवाया केवळ त्यांच्या मर्यादेत राहून शक्य नसून, कार्यालयातील काही कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेत, असा थेट आरोप फाउंडेशनने केला आहे.
कामगारांच्या योजनांमध्ये झालेल्या विलंबाला दलाली जबाबदार असून, वर्षानुवर्षे जुन्या कामगारांना अजूनही स्मार्ट कार्ड वाटप झालेले नाही. काही कामगारांच्या नावांची नोंदणी असूनही त्यांना योजनेचा लाभ मिळालेला नाही. हे सर्व प्रकार फौजदारी स्वरूपाचे असून, जिल्हा प्रशासन व पोलिसांनी याची गंभीर दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी फाउंडेशनतर्फे करण्यात आली आहे. कामगारांची नोंदणी आणि नूतनीकरण केवळ प्रत्यक्ष साइटवरील तपासणीनंतरच करावी, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.
कामगार हक्कासाठी आणि बनावट नोंदणीमुळे बुडालेल्या योजनांचा न्याय मिळवण्यासाठी समर्पण फाउंडेशनची लढाई निर्णायक टप्प्यावर पोहचली आहे. जिल्हा कामगार कार्यालयाच्या गेटसमोर घंटानाद होईल, पण तरीही प्रशासनाने डोळस भूमिका घेतली नाही तर रस्त्यावरचा आक्रोश आता टोकाचा होईल, असा इशारा देत फाउंडेशनने यावेळेस आरपारची लढाईच छेडली आहे.