*दैवी योगायोग
ग्रंथराज ज्ञानेश्वरी दिंडी सोहळ्याचे हे पहिलेच वर्ष असूनही ज्ञानेश्वरी ग्रंथांनी व नेवासाच्या पादुकांनी दिंडी मार्गावर सर्व भावंडांच्या तसेच अनेक संतांच्या पालख्यांची झालेली भेट ही वारकरी संप्रदायामध्ये अत्यंत महत्त्वाचे आणि दैवी योगायोगाचे मानले जात आहे
“नेवासा
“भेटीची आवडी, कृपा तातडी, उतावीळ माउली” या अभंगाचे साक्षात दर्शन वाखरी (पंढरपूर) येथे आज घडले. आळंदीहून आलेली संत ज्ञानेश्वर माउलींची पालखी आणि नेवासे येथून प्रथमच प्रस्थान केलेल्या ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखीची ऐतिहासिक आणि भावनांनी ओतप्रोत भरलेली भेट येथे झाली. “माऊली माऊली” चा गजर अन् जयघोष करत खांदेकऱ्यांनी व लाखो वारकऱ्यांनी त्या घटनेचा आनंद जल्लोषात साजरा केला.
पहाटे संत ज्ञानेश्वर महाराज पैसखांब मठात काकडा आरती व वेदपठणाने दिवसास प्रारंभ झाला. नंतर वेदांताचार्य देविदास महाराज म्हस्के यांच्या हस्ते ग्रंथराज व पैसखांबाचे पूजन करण्यात आले. यावेळी मठाचे विश्वस्त कैलास जाधव, कृष्णा पिसोटे, ज्ञानदेव शिंदे, राजू वाबळे, पोपटराव जगताप, बाळासाहेब जाधव, राजू पेहर आदी उपस्थित होते.
दहा वाजता ग्रंथराज पालखी वाखरी येथे पोहोचताच माऊलींच्या पादुकांची भावस्पर्शी भेट घडली. त्याआधी ज्ञानेश्वरी ग्रंथाची भावंडभेट झाल्यानंतर आज माउलींच्या पादुकांशी झालेली ही भेट भक्तांसाठी पर्वणी ठरली. आळंदी संस्थानतर्फे ग्रंथराज पालखीचा श्रीफळ व टोपी देऊन सत्कार करण्यात आला.
पंढरपूरच्या नगर प्रदक्षिणा मार्गावर या पालखीला संत निवृत्तीनाथ, संत सोपानकाका, संत मुक्ताबाई, संत निळोबाराय व आपेगाव येथील पालख्या भेटल्या. विशेष म्हणजे अहिल्या नगर येथे संत निवृत्तीनाथांची भेट झाली होती, मात्र मुक्ताबाई व सोपानकाकांची भेट राहिली होती. भक्तीमय वातावरणात अखेर या दोनही पालख्या दर्शनास आल्या अन् लाखो वारकऱ्यांच्या “ज्ञानोबा माऊली, तुकाराम” जयघोषात भक्तीरस ओसंडून वाहू लागला गेले दोन दिवस संत ज्ञानेश्वर महाराज मठ, भटुबरे येथे सध्या ज्ञानेश्वरी पालखी विराजमान आहे. येथे राज्यभरातून आलेले भाविक ज्ञानेश्वरी ग्रंथ व पैसखांब प्रतिकृतीचे दर्शन घेत आहेत.
या ऐतिहासिक भेटीने संत परंपरेतील ग्रंथ आणि भक्तीचा संगम अनुभवणाऱ्या पंढरीच्या भूमीत वारकरी संप्रदायासाठी नवसंजीवनीचा क्षण निर्माण केला आहे.