कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी, महागाई भत्ता तसेच इतर भत्ते नियमानुसार मिळालेले नाहीत–३५८ जुने कायम कर्मचारी साखळी उपोषण करणार
गणेशवाडी (वार्ताहर) –
शनिशिंगणापूर देवस्थानातील जुन्या कर्मचाऱ्यांचा सहाव्या वेतन आयोगाच्या चुकीच्या अंमलबजावणीवरून संताप उफाळून आला आहे. याबाबत वेळोवेळी लेखी व तोंडी पाठपुरावा करूनही प्रशासनाने दखल घेतलेली नसल्यामुळे कर्मचाऱ्यांनी ४ ऑगस्टपासून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
दि. १ ऑगस्ट २०२४ पासून सहावा वेतन आयोग लागू करण्यात आला असला, तरी तो चुकीच्या पद्धतीने अंमलात आणल्याचा आरोप करण्यात आला आहे. अनेक कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी, महागाई भत्ता तसेच इतर भत्ते नियमानुसार मिळालेले नाहीत. कामगार आयुक्तांच्या उपस्थितीत झालेल्या आठ बैठका निष्फळ ठरल्या असून केवळ वेळकाढूपणा झाल्याचा आरोप युनियनने केला आहे.
कर्मचाऱ्यांनी प्रशासनासमोर पुढील मागण्या ठेवल्या आहेत – सहाव्या वेतन आयोगानुसार सर्व कर्मचाऱ्यांना योग्य वेतनश्रेणी व भत्ते मिळावेत, महागाई भत्ता २४६ टक्के करण्यात यावा, १२ वर्षे सेवा झाल्यानंतर कालबद्ध पदोन्नती मिळावी, सेवा जेष्ठतेनुसार पदोन्नती किंवा समकक्ष वेतनश्रेणी दिली जावी, कोरोना काळातील १८ महिन्यांचे थकीत वेतन अदा करण्यात यावे, दर सहा महिन्यांनी भत्त्यात नियमानुसार वाढ करण्यात यावी, पगारपत्रक शासनमान्य तज्ञ लेखापालाकडून पडताळले जावे आणि १ ऑगस्ट २०२४ पासूनच्या फरकासह सुधारित वेतन मिळावे.

या मागण्यांसाठी श्री शनैश्वर देवस्थान कामगार युनियनचे अध्यक्ष शामसुंदर शिंदे, सचिव अजित शेटे, संचालक सुखदेव मनाळ, सुदाम भुसारी, संदीप दरंदले आदी प्रमुख सदस्य ४ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता महाद्वाराजवळ छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आमरण उपोषणाला बसणार असून, त्यांना पाठिंबा म्हणून उर्वरित ३५८ जुने कायम कर्मचारी साखळी उपोषण करणार आहेत.
या उपोषणामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीला देवस्थान प्रशासन जबाबदार राहील, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले असून, याबाबतचे निवेदन जिल्हा व तालुका स्तरावरील संबंधित सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे युनियनने कळविले आहे.