डिजिटल युगातील पत्रकारिता आणि मूल्यांची पुनस्थापना या विषयावर सोनई येथील ओम शांती केंद्रात आयोजित मीडिया संमेलन…
सोनई अशोक भुसारी याज कडून–
“आज जगभर काम, क्रोध, लोभ यांसारख्या विकारांनी माणूस दुःखात गुरफटला आहे. अशा काळात नकारात्मकतेचा प्रसार न करता, सकारात्मकतेचा प्रसार करणारी सशक्त पत्रकारिता ही काळाची गरज आहे,” असे मत माउंट आबू (राजस्थान) येथील मीडिया विभागाचे राष्ट्रीय समन्वयक ब्रह्मकुमार डॉ. शांतनु भाई यांनी व्यक्त केले.
डिजिटल युगातील पत्रकारिता आणि मूल्यांची पुनस्थापना या विषयावर सोनई येथील ओम शांती केंद्रात आयोजित मीडिया संमेलनात ते बोलत होते. या वेळी महाराष्ट्र राज्य मीडिया विभागाचे समन्वयक प्रा. डॉ. सोमनाथ वडनेरे (जळगाव), ब्र. सोमनाथ भाई (पुणे), दीपक हारके (नगर) यांच्यासह प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, सोशल मीडिया, जनसंपर्क व जाहिरात क्षेत्रातील पत्रकार व प्रतिनिधी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत ओम शांती केंद्राच्या संचालिका ब्र. उषा दीदी यांनी पुष्प देऊन केले.
डॉ. शांतनु पुढे म्हणाले, “एकत्रित कुटुंबपद्धती लोप पावत असून जगभर युद्ध, नैसर्गिक आपत्ती, विध्वंसाची स्थिती आहे. अशा वेळी पत्रकारांवर खूप मोठी जबाबदारी आहे. देशात सध्या ८५०० ब्रह्माकुमारी सेवा केंद्रे कार्यरत असून, भारत सशक्त व्हायचा असेल तर मीडिया सशक्त असणे गरजेचे आहे. वाईट बोलणे, लिहिणे, शेअर करणे थांबवून सकारात्मक पत्रकारिता करण्याचा संकल्प हवा.”
प्रा. डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी डिजिटल पत्रकारितेतील आव्हाने, संपादकीय मूल्यांची घसरण, पत्रकारांवरील दबाव यांची सखोल मांडणी केली. तर पुण्याचे ब्र. सोमनाथ भाई यांनी सांगितले, “आज संगणक तंत्रज्ञानाला भीत न बाळगता त्याचा सकारात्मक उपयोग करत टेक्नोस्नेही पत्रकारिता करावी. संवेदनशीलता हरवू न देता मूल्याधिष्ठित पत्रकार तयार करावेत.”
यावेळी पत्रकार सुखदेव फुलारी यांनी तालुक्यातील पत्रकारांच्या कार्याचा आढावा घेतला.
कार्यक्रमाचे आयोजन आणि सेवा कार्यात खुशी दीदी, अनिल भाई, वडघुले भाई, आप्पाभाई, वसंतभाई, दिनकर भाई, नंदुभाई, ओंकारभाई, जे. के. शेटे, ढेरे गुरुजी, शेळके भाई, धनंजय तागड भाई आणि माता दीदी यांनी मोलाची साथ दिली.